

नागपूर - डिसेंबर आटोपला,मावळत्या वर्षाला निरोप दिला. आता जानेवारी महिना सुरू आहे. थंडी कमी, अधिक प्रमाणात उपराजधानीत जाणवतच आहे. आता तर मार्च महिन्यापर्यंत शीत लहरींची शक्यता केंद्रीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मध्य भारताचा विचार करता विदर्भात यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान हवामान बदल दिसण्याची शक्यता आहे.
विदर्भात जानेवारीत थोड्याफार प्रमाणात पावसाचीही शक्यता आहे. मध्य भारतातील काही भागात, विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सकाळी तसेच रात्री गारठा जाणवू शकतो त्याचा परिणाम आरोग्य आणि शेतीवर होऊ शकतो. या काळात श्वसन विकार असलेल्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे. दरम्यान ,फेब्रुवारी, मार्च महिन्यात विदर्भामध्ये हवामान परिस्थिती बदलण्याचा अंदाज आहे. या दोन महिन्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून रब्बी पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र अवकाळी पावसाची शक्यता घेता शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. एकंदरीत जानेवारीत कोरडे,काहीसे थंड हवामान तर फेब्रुवारी मार्चमध्ये पावसात वाढ असा संमिश्र हवामानाचा अनुभव यावर्षी विदर्भाला येऊ शकतो. जानेवारी महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. त्यामुळे थंडी बरोबरच दुपारच्या वेळी उष्णतेची जाणीव होण्याची शक्यता आहे. अर्थात या तापमानातील चढ- उताराचा परिणाम पिकांवर तसेच आपल्या आरोग्यावर देखील होऊ शकतो.