Elderly cattle grazer killed
चंद्रपूर : चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीत वाघाच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 29) दुपारी उघडकीस आली. मांडा तुकुम परिसरातील महादवाडी बीटमध्ये ही घटना घडली. वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली रेंजअंतर्गत कंपार्टमेंट क्रमांक 696, गाव मांडा तुकुम येथे आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. मृत व्यक्तीचे नाव रमेश नागो बोमनवार (वय 54) असे असून ते व्यवसायाने गुराखी होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रमेश बोमनवार हे नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी जंगलात गेले. जनावरे चरत असतानाच अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
वन विभागाने पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला असून मृताच्या कुटुंबाला शासन नियमांनुसार त्वरित आर्थिक मदतीची प्रक्रिया सुरू केल्याचे विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांनी सांगितले. या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा संवेदनशील जंगल परिसरात एकटे फिरणे टाळावे तसेच वाघ व इतर वन्यप्राण्यांची हालचाल दिसल्यास तात्काळ वनाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.
या घटनेमुळे मांडा तुकुम गावात शोककळा पसरली आहे. वनक्षेत्रात वाढत चाललेल्या वाघांच्या हालचालीबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.