Animals Die due to broken Electrical Wire
चंद्रपूर : वादळी वाऱ्यामुळे तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारांना जनावरांचा स्पर्श होऊन ८ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. यामध्ये ६ बैल व २ गायींचा समावेश आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर नैसर्गिक संकट ओढावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह कोसळत आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात घरांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे विद्यूत खांब कोसळत आहेत. झाडे उन्मळून पडत आहेत. मोठ्या नुकसानीला शेतकरी शेतमजूर व नागरिकांना मे महिन्यापासून सामोरे जावे जागत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. अशातच शेतशिवारात असलेले विद्युत खांब काही ठिकाणी कोसळले आहेत.
सावली तालुक्यातील उसेगाव येथील काही शेतकरी लगतच्या शेतशिवारात आज सकाळी जनावरे चारायला घेऊन गेले होते. शिवारात जनावरे चरत असताना दुपारी चारच्या सुमारास उध्दव रोहणकर यांच्या शेतात विद्युत खांबाचे तार तुटलेले होते. दरम्यान, जनावरे चरत जात असताना त्यांचा जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाला. यामध्ये विद्युत शॉक लागून आठ जनावरे दगावली.
कालीदास पाल, बाळुजी ठुसे, देवाजी भोयर, माणिक गोहणे, अरुण भोयर, भोजराज गोहणे यांचा प्रत्येकी एक बैल तर हिराजी गोहणे व संतोष भोयर यांची प्रत्येकी १ गाय या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडली आहे. या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सायंकाळी सदर घटनेची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचा पपंचनामा केला आहे. काही दिवसात खरीपाचा हंगाम सुरू होणार आहे. आणि ऐनवेळी संकट कोसळल्याने शेतकऱ्यांचे जनावरे ठार झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हंगामाकरीता बैल कुठून आणायचे किंवा खरेदी करायचे, असा प्रश्न पडला आहे. सदर शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.