चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर टोल नाक्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अंगावर शहारे आणणारी एक धक्कादायक घटना घडली. टोल शुल्क मागितल्याच्या रागातून एका (छोटा हत्ती) वाहन चालकाने थेट टोल कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली. या घटनेत टोल ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना शनिवारी ( पहाटे १.३० च्या सुमारास घडली. संजय अरुण वांढरे (वय २७ ) असे गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बल्लारशाहहून चंद्रपूरकडे येणारा वाहन चालक टोल वाचवण्याच्या हेतूने रेषा ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या संगणक ऑपरेटरने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त चालकाने गाडी न थांबवता थेट त्याच्या अंगावर गाडी घातली. या घटनेत संजय वांढरे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक कर्मचाऱ्यांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.