

Chandrapur Crime
चंद्रपूर : बल्लारपूर शहराजवळ एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. शहराच्या हद्दीत असलेल्या कारवा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीने गायीसोबत विकृत आणि अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना सुमारे २५ दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास घडली. एका स्थानिक नागरिकाने छतावरून व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रकार चित्रीत केला होता.
सदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे विशेषतः धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. संघटनांनी आरोपीवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओची सत्यता तपासली जात असून, घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. बल्लारपूर पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.