Do not believe any rumors related to blackout or war: District administration appeals
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. विविध माध्यमातून ब्लॅकआऊट किंवा युध्दासंदर्भात येणा-या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार या संदर्भातील अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नागरिकांना आश्वस्त केले.
युध्दजन्य परिस्थिती, मॉक ड्रील, ब्लॅकआऊट संदर्भात वृत्तांकन करणारे विविध प्रसारमाध्यमे किंवा सोशल मीडियातून विविध प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ प्रसारीत करण्यात येतात. सदर बाबी अधिकृतच असेल याची खात्री देता येत नाही, किंबहुना ते पूर्वीचेसुध्दा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे युध्द किंवा ब्लॅकआऊट संदर्भातील प्रशासनाकडून आलेली माहितीच अधिकृत समजावी. तसेच या संवेदनशील काळात सोशल मीडिया हाताळतांना जबाबदारीचेसुध्दा भान ठेवावे. आपल्याकडून अफवा पसरणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा बळी गेला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून ते नष्ट केले. यानंतर पाकिस्तानने सीमेवरील गावांवर आणि शहरातील नागरी वस्तींवर हल्ले करून युद्ध नियमांचा भंग केला आहे. मात्र हे सर्व हल्ले भारतीय सैन्याने निष्प्रभ केले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला आहे.
पाकिस्तानकडून भारताला उकसवण्यासाठीचे प्रयत्न चालवले जात आहेत. सीमेवरील चौक्यांवरून पाकिस्तानी सैन्य रात्रीच्यावेळी गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. तसेच नागरि वस्त्यांवरही हल्ले करत आहे. याला भारताकडूनही जशास तसे उत्तर दिले जात आहे.
पाकिस्तानने सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. हे एकप्रकारे भारताला आव्हान देण्यासारखे आहे. भारतानेही आपले सैन्य अलर्ट मोडवर ठेवले असून, पाकिस्तानच्या कोणत्याही आगळीकिला सडेतोड उत्तर देण्याची तयारी केली आहे. असे असले तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात काही व्हिडिओ व्हायरल होत असून, ते खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून दिलेली माहितीच अधिकृत समजावी अशी माहिती देण्यात आली आहे.