Chandrapur Nagpur highway extortion
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अपहरण आणि खंडणीचा थरार उघडकीस आला असून, बांधकाम कंत्राटदाराचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडून तब्बल १८ लाख ५० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
चंद्रपूर शहरालगत चंद्रपूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शनि मंदिर परिसरात हा थरारक प्रकार घडला. राजुरा (जि. चंद्रपूर) येथील बांधकाम कंत्राटदार काहिलकर यांचे आरोपींनी अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून १८.५० लाख रुपयांची खंडणी वसूल केली.
या घटनेची तक्रार काहिलकर यांनी पडोली पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून त्वरित कारवाई केली आणि आरोपींना ताब्यात घेतले.
आकाश वाढई, भारत माडेश्वर आणि योगेश गोरडवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून पुढील चौकशी सुरू असून, या प्रकरणातील संभाव्य इतर दुवे आणि गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्राबाबत तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश ठिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सखोल तपासासाठी पथके कार्यरत आहेत.
पडोली पोलीस स्टेशनमध्ये अपहरण, शस्त्राच्या धाकावर खंडणी वसूल केल्याप्रकरणी गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस दलाकडून कडक भूमिका घेतली जात असून, अशा गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी गस्त आणि तपास यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे.