जिवतीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकांसह २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश (Pudhari Photo)
चंद्रपूर

Chandrapur Political News | काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार; जिवती येथे ५ नगरसेवकांसह २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Congress NCP to BJP | राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळेंच्या उपस्थितीत प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

Congress NCP Corporators join BJP in Jivati

चंद्रपूर : जिवती नगर पंचायतीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या ५ नगरसेवकांसह विविध पक्षांच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिवती येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पक्षप्रवेश झाला. जिवती तालुक्याच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांमुळे हात बळकट झाल्याची प्रतिक्रिया आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी गोंडपिपरी येथील नगर पंचायतीवर काँग्रेस व मित्र पक्षांची सत्ता होती. दरम्यान, त्या ठिकाणी नगराध्यक्षांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश करून काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करून पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने भाजपने आपली सत्ता स्थापन केली.

गोंडपिपरी येथील घटनेनंतर जिवती येथे शुक्रवारी मोठी राजकिय उलथापालथ झाली. जिवती नगर पंचायतमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे पाच नगरसेवक आणि विविध पक्षातील सुमारे 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिवती येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिवती नगर पंचायतीचे नगरसेवक शामराव गेडाम, अहिल्याबाई चव्हाण,अनुसया राठोड,लियाकतबी रसुल शेख,अश्विनी गुरमे यांच्यासह देवलागुडा येथील सरपंच सुनिता किसन जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर जिवती येथील विविध पक्षांचे सुमारे दोनश कार्यकर्त्यांनी विविध पक्षांना रामराम ठोकून भाजपचा दुप्पटा खांद्यावर घेतला. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशाने जिवती शहरासह तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यांच्या राजकिय गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. त्यापूर्वीच आमदार देवराव भोंगळे यांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. अगोदर गोंडपिपरी आणि काल जिवती तालुक्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पक्षात प्रवेश करवून घेण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. या पक्ष प्रवेशामुळे जिवती तालुक्यात भाजपची ताकद वाढल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

जिवतीची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न ?

गोंडपिपरी येथे काँग्रसेची सत्ता येऊनही भाजपने आपल्या चतुरखेळीने तेथील सत्ता उलथवून टाकली. भाजपची नगराध्यक्ष विराजमान करून आपली सत्ता स्थापन केली. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेससह मित्रपक्षांना झटका बसला. त्याप्रमाणेच आता जिवती मध्ये आमदार देवराव भोंगळे यांनी राजकिय खेळी खेळली आहे. जिवती नगर पंचायतीमध्ये 17 सदस्य आहेत. या ठिकाणी भाजपची तेवढी ताकद नसल्याने एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 12 नगरसेवक निवडून आल्याने त्यांनी नगर पंचायतीवर सत्ता स्थापन केली. 5 नगरसेवक निवडून आलेली गोंडवाना गणतंत्र पार्टी विरोधक म्हणून काम पाहत आहे.

भाजपने खेळलेल्या पहिल्याच खेळीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस पक्षाचे 5 नगरसेवक भाजपमध्ये आणले आहे. त्यामुळे भाजपची नगरसेवक संख्या 5 झाली आहे. काँग्रेस, राकाँ यांची संख्या आता 7 झाली आहे. तर गोंडवाणा गणतंत्र पार्टीकडे 5 नगरसेवक आहेत. तूर्तास येथे राजकिय सत्तांतराचा धोका निर्माण झाला आहे. परंतु, गोंडपिपरीमध्ये खेळलेल्या खेळीप्रमाणेच जिवतीमध्ये भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांचा सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? भविष्यात येथे मोठा राजकिय भूकंप तर होणार नाही ना ? अशी राजकिय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

जिवती तालुक्याच्या विकासासाठी हात बळकट झाले : आमदार भोंगळे

जिवती शहर व तालुक्यातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपवर विश्वास ठेवून प्रवेश घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा करण्याचा मोठी ताकद आम्हाला मिळाली. राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. जिवती तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. जिवती तालुक्यातील शेकडों कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिवती तालुक्याच्या विकासासाठी हात बळकट झाले आहे. गोंडपिपरीमध्ये काँग्रसचे नगरसेवक भाजप मध्ये आले. आणि त्या ठिकाणी भाजपची सत्ता स्थापन करण्यात आली. त्याठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष आरूढ झाला. त्यामुळे तेथे गोंडपिपरी शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याचे आमदार देवराव भोंगळे यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT