Rajura Congress Janakrosh Morcha
चंद्रपूर: शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, निराधार आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची आश्वासने देऊन सत्तेत आलेले सरकार आता दुष्काळाच्या काळातही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यास टाळाटाळ करत आहे, असा आरोप त्यांनी जनआक्रोश मोर्चात केला.
राजुरा तालुका काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल संघटनांच्या वतीने आयोजित मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांचा सहभाग होता. भवानी माता मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चाने " शेतकर्यांचा सातबारा कोरा करा", “शेतकरी एकता जिंदाबाद” आणि “फसव्या सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले.
माजी आमदार धोटे म्हणाले, “चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतानाही अद्याप जिल्ह्य़ात ओला दुष्काळ घोषित करण्यात आलेला नाही. मतचोरी करून निवडून आलेल्या अशा आमदारांची सदस्यता रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी. जनतेच्या समस्या न सोडवणाऱ्या या सरकारविरुद्ध आता जनआक्रोश उफाळून येईल. शेतकरी व जनसामान्यांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेसचा लढा सातत्याने सुरू राहील. तर खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. मतांची चोरी करून सत्तेत आलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी केवळ लूट आणि दिशाभूल करत आहे.
मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे २७ ठोस मागण्या सादर करण्यात आल्या. यात शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करणे, ओला दुष्काळ जाहीर करणे व आपत्तीग्रस्तांना भरपाई देणे, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घेणे, बोगस मतदार नोंदणी प्रकरणी कारवाई करणे, खतांचा कृत्रिम तुटवडा दूर करणे, कापूस व सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज, कृषिपंपांना नियमित वीजपुरवठा अशा प्रमुख मागण्या आहेत. तसेच अतिक्रमणधारकांना पट्टे देणे, तरुणांना स्थानिक उद्योगात रोजगार, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ पेन्शन वाढवणे, महिला बचत गटांना व्याजमाफी आणि रस्ते व जलजीवन मिशनची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करणे यासह इतर सामाजिक मागण्या देखील निवेदनात नमूद आहेत. हे निवेदन राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. शासनाने या मागण्या तातडीने मान्य न केल्यास अधिक उग्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.
यावेळी खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, देविदास सातपुते, कामगार काँग्रेसचे सुरजभाऊ ठाकरे, सभापती विकास देवाळकर, नानाजी आदे, नंदकिशोर वाढई, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, गजानन भटारकर, विलास तुमाने, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, बापू धोटे, सुरेश पावडे, विनोद झाडे, राजू झाडे, सचिन भोयर, शैलेश लोखंडे, विवेक येरणे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, किसान सेल, ओबीसी सेल, अल्पसंख्याक व अनुसूचित जाती-जमाती सेल, तसेच इतर फ्रन्टल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.