Chimur Bus Station Incident Ceiling Collapse in Storm
चंद्रपूर : प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी, या करीता नव्यानेच तयार करण्यात आलेल्या चिमुर येथील एसटी बसस्थानकाच्या बांधकामाची वादळाने पोलखोल केली आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यात बसस्थानकातील आतील सिलिंग कोसळले आहे. त्यामुळे येथील बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चिमूर येथील एसटी बसस्थानक मोडकडीस आल्याने प्रवाशांकरीता नवीन आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत मंजूर करण्यात आली. काही दिवसात त्या नवीन इमारतीचे बांधकामही करण्यात आले. आणि प्रवाशांच्या सेवेत सर्व सोई सुविधांनी युक्त बसस्थानक उपलब्ध करण्यात आले. परंतु, सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने या नवीन सुसज्ज बसस्थानकाच्या बांधकामाची पोलखोल केली आहे.
21 मेरोजी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास वादळाने बसस्थानकाचे छप्पर पडले. त्यानंतर आता आतील सिलिंग कोसळले आहे. आठवडाभरापूर्वीच याच बसस्थानकारील स्वच्छतागृहातील नळाच्या तोट्या, दारे तुटलेल्या स्थितीत आढळून आल्या. यावर सावरासावर करताना अधिकाऱ्यांच्या चांगलेच नाकीनऊ आले असतानाच आता सिलिंग कोसळल्याने हायटेक बसस्थानकाचा फुगा फुटला आहे. तीन वर्षापूर्वीच बांधकाम झालेल्या इमारतीच्या बांधकामाचे तीनतेरा वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बसस्थानक किती काळ टिकेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बसस्थानकाचे छप्पर कोसळले. त्यावेळी या ठिकाणी कुणीही प्रवासी नव्हते. तिथे नेहमी आश्रयास राहत असलेले भिकारी शुध्दा नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसस्थानकाची अल्पावधीतच दुरवस्था होऊ लागल्याने कंत्राटदाराने केलेल्या बांधकामाच्या दर्जाविषयी प्रवाशांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.