Tadoba Chhota Matka tiger capture
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बुध्द पौर्णिमेच्या (12 मे) च्या रात्री ब्रम्हा (T-158) वाघासोबत झालेल्या जोरदार धुमश्च्रकीत जखमी झालेला ताडोबा किंग छोटा मटका (T-१२६) ला उपचारासाठी ताडोबा प्रशासनाने काल बुधवारी जेरबंद केले आहे. त्याचेवर चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) येथे उपचार सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वीच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने छोटा मटकाच्या प्रकृती चिंता व्यक्त करीत स्वत: जनहित याचिका दाखल करून न्यायमूर्ती ॲड यश सांबरे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली. छोटा मटकावर न्यायालायाने वॉच ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तातडीने ताडोबा प्रशासनाने कार्यवाही केली आहे. या बाबतचे वृत्त 'पुढारी डिजिटल'ने प्रकाशित केले होते, हे विशेष.
बुध्द पौर्णिमेच्या रात्री ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी, बफर परिक्षेत्रा अंतर्गत निमढेला नियतक्षेत्राच्या कक्ष क्र.63 मधील उमरीखोरा परिक्षेत्रात छोटा मटका (T-126) व ब्रम्हा (T-158) या दोन वाघामध्ये तीव्र संघर्ष झाला होता. या झुंजीत बह्मा वाघाला ठार करून छोटा मटका गंभीर जखमी झाला. त्याच्या तोंडाला व पायाला गंभीर दुखापत झाली. पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालता येत नव्हते. तेव्हा पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने तेव्हापासून छोटा मटकावर नैसर्गिक उपचार सुरू केले होते, परंतु अद्यापही छोटा मटकाची प्रकृती ठणठणीत झालेला नाही. सोशल मीडियावर पर्यावरण तथा वन्यजीव प्रेमींनी ताडोबा किंग छोटा मटकाचे जीव वाचविण्यासाठी गंभीर चिंताव्यक्त करीत अनेकदा त्याच्या हालचालीचे जंगलातील व्हिडीओ शेअर केले.
सोशल मीडिया, माध्यमे आणि वन्यजीव पर्यावरण प्रेमींनी छोटा मटकाच्या जीव वाचविण्याविषयी चिंता व्यक्त केल्यानंर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:छोटा मटकाच्या तब्येतीची काळजी करीत दखल घेतली आहे. नागपूर खंडपीठात स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली. न्यायमुर्ती अनिल किलोर व अजित कडेठाणकर यांच्या समक्ष सुनावणी नंतर या प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. यश सांबरे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली. आठवडाभरात छोटा मटका विषयी नियमानुसार जनहित याचिका तयार करण्यास निर्देश देण्यात आले. छोटा मटकाच्या प्रकृतीवर न्यायालयाने निगराणी सुरू केली होती. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर एनटीसीए मानक कार्यपद्धतीनुसार, गठित तांत्रिक समितीचे शिफारशीनुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी जखमी छोटा मटका (T-126) जेरबंद करून त्याच्यावर उपचार करण्याचे आदेश काल बुधवारीच पारीत केले होते. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रशासनाने छोटा मटकाला जेरबंद करण्यासाठी तातडीने पाऊले उचलली.
काल बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) अंतर्गत खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मधून गंभीर जखमी छोटा मटकाला बचाव मोहिमे (Rescue) अंतर्गत त्याला यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी चंद्रपुरातील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) मध्ये हलवून उपचार सुरू करण्यात आला आहे. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रभूनाथ शुक्ल व उपसंचालक (बफर) आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शीघ्र कृती दल (RRT) कडून सहाय्यक वनसंरक्षक अनिरुद्ध ढगे यांच्या नेतृत्वात जेरबंद करण्याची कार्यवाही करण्यात आली. छोटा मटकाला पकडताना विशेष काळजी घेण्यात आली.