Chandrapur Water Crisis : वैनगंगा नदीच्‍या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Water Crisis : वर्धा, पैनगंगा, वैनगंगा, वेणा नद्यांची पातळी घसरली; चंद्रपूर जिल्‍ह्यात पाणीटंचाईचे संकट गहिरे

मृग कोरडाच; अर्धा जून उलटला तरी पावसाचा पत्ता नाही

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Water Crisis

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : मृग नक्षत्र सुरू होऊनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जून महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असतानाही पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत. दुसरीकडे वर्धा, पैनगंगा, वैनगंगा आणि वेणा नदीपात्रातील पाणीपातळीही झपाट्याने घटत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या ताज्या आकडेवारीवरून ग्रामीण भागातून वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, वैनगंगा आणि वेणा नद्यांची पाण्याची पातळी घसरली आहे.

नदी पाणीपातळीतील घट चिंताजनक

चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाने १५ जून रोजी सकाळी ८ वाजता जाहीर केलेल्या नदीपातळीच्या अहवालानुसार, अनेक नदी निरीक्षण केंद्रांवरील पाण्याची पातळी इशारा आणि धोका पातळीपेक्षा खूपच कमी आहे. पैनगंगा नदीवरील पैनगंगा सीडब्ल्यूसी केंद्रात पाणीपातळी १९९.२४ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून ती घसरत असल्याचे दिसून आले आहे. वर्धा नदीवरील वरोरा (नामपूर) केंद्रातही पाणीपातळी १५८.५३ मीटरपर्यंत खाली आली असून नदीचा प्रवाह घटला आहे.

प्रमुख नद्यांमध्ये पुरेसा जलसाठा नाही

घुग्घुस येथील वर्धा नदीच्या केंद्रावर पाणीपातळीत किरकोळ वाढ नोंदली असली तरी ती समाधानकारक नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वैनगंगा नदीवरील चिमूरघाट केंद्रावर पाणीपातळी स्थिर असून वेणा नदीवरील आष्टी केंद्रावरही अपेक्षित वाढ झालेली नाही. एकूणच जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण झालेला नसल्याचे चित्र आहे.

लहान जलस्रोतांचे पाणी होतय झपाट्याने कमी

ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोतांचे पाणी झपाट्याने कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. अनेक गावांमध्ये टँकरची मागणी वाढू लागली असून प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सार्‍यांच्‍या नजरा वरुण राजाच्‍या आगमनाकडे

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस केव्हा बरसणार याकडे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने यंदाच्या खरीप हंगामाबाबतची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेली मशागत व तयारी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. उशिरा पाऊस झाल्यास पेरणीचा कालावधी कमी होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT