Warora Municipal Council Water Supply Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | वरोऱ्यात नळाच्या पाण्यात कृमीसदृश जंत आढळल्याचा दावा; पाणीपुरवठ्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

नगरसेविका सीमा तडस यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Warora Municipal Council Water Supply

चंद्रपूर :  वरोरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील कमला नेहरू प्रभागातील ढीवर वार्ड येथे नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्यात कृमीसदृश जंत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

परिसरातील गणेश रुयारकर आणि कांचन रुयारकर यांच्या घरी नळाच्या पाण्यात काही कृमीसदृश जीव आढळल्याचे नगरसेविका सीमा सचिन तडस यांनी नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीने तपासणी व आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणे, संबंधित जलवाहिन्यांची पाहणी करणे, आवश्यकतेनुसार पाणी शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण करणे, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

नगर परिषद प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्यात यावा, अशी विनंती नगरसेविका तडस यांनी केली आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पाण्यात आढळल्याचा दावा करण्यात आलेले जीव नेमके कोणत्या प्रकारचे आहेत, याची अधिकृत ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT