अंगणवाडीच्या परिसरालगत प्रस्तावित बारला परवानगी देण्याच्या हालचालींना महिला व पालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | अंगणवाडीच्या शेजारी बार नको; टेमुर्ड्यात महिलांचा प्रशासनाला इशारा

प्रस्तावित बारला महिला व पालकांचा तीव्र विरोध; परवानगी दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Warora Proposed Bar Near Anganwadi

चंद्रपूर : वरोरा : वरोरा तहसील अंतर्गत टेमुर्डा गावातील मध्यवर्ती भागात अंगणवाडीच्या परिसरालगत प्रस्तावित बारला परवानगी देण्याच्या हालचालींना महिला व पालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. लहान बालकांची अंगणवाडी असलेल्या संवेदनशील परिसरात मद्यविक्रीचा व्यवसाय सुरू करणे योग्य नसल्याचे सांगत बारला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अशी मागणी संबंधित उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने निर्णय न बदलल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

टेमुर्डा गावाच्या मध्यवर्ती भागात अंगणवाडी असून, त्याच परिसरात प्रस्तावित पोलीस चौकीच्या इमारतीचे बांधकामही सुरू आहे. या संवेदनशील परिसरालगत हॉटेलचे बांधकाम करून त्याठिकाणी बार सुरू करण्यासाठी परवानगीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील महिला, पालक आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंगणवाडीत परिसरातील लहान मुले नियमित येत असल्याने त्यांच्या अगदी जवळ मद्यविक्रीचा व्यवसाय सुरू झाल्यास त्याचा बालकांवर तसेच पालकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. त्यामुळे सार्वजनिक हित आणि बालकांच्या सुरक्षित वातावरणाचा विचार करून प्रस्तावित बारला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीही दिले होते निवेदन

बारला परवानगी देऊ नये, यासाठी टेमुर्डा येथील महिला व पालकांनी यापूर्वीही संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले होते. मात्र, ग्रामस्थांचा विरोध कायम असतानाही परवानगीची प्रक्रिया पुढे नेण्यात आल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.

ग्रामस्थांची भूमिका जाणून घेण्याची मागणी

गावातील वातावरण बिघडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने ग्रामस्थ, महिला, अंगणवाडीतील बालकांचे पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची भूमिका जाणून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रस्तावित बारला परवानगी देण्यात आल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

बालकांच्या हिताला प्राधान्य द्यावे

अंगणवाडीच्या परिसरात बार सुरू करण्याऐवजी प्रशासनाने नागरिकांच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार करावा आणि प्रस्तावित बारला परवानगी देऊ नये, अशी ठाम भूमिका टेमुर्डा येथील महिला व पालकांनी घेतली आहे. प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा निर्धारही महिलांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT