AI image
चंद्रपूर

Chandrapur | वरोऱ्यात हादरली जमीन; कोळसा खाणीत होणाऱ्या तीव्र ब्लास्टिंगच्या परिणामाची शक्यता; नागरिकांमध्ये भीती

Chandrapur Warora Earthquake & Coal Mine Blasting | वरोऱ्यात हादरली जमीन; कोळसा खाणीत होणाऱ्या तीव्र ब्लास्टिंगच्या परिणामाची शक्यता; नागरिकांमध्ये भीती

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर - वरोरा शहर आणि तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता तीव्र झटके जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या झटक्यांमुळे खिडक्यांच्या काचा आणि भांडी हलू लागली, तर काही ठिकाणी घरातील वस्तू खाली पडल्या. त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले.

या झटक्यांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी परिसरातील कोळसा खाणीत होणाऱ्या अत्यंत तीव्र ब्लास्टिंगमुळे हे झटके जाणवत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील काही महिन्यांपासून परिसरात अशा प्रकारचे झटके जाणवत आहेत. यामुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे जाण्यासोबतच छताचा प्लास्टर आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

यापूर्वी २४ ऑगस्ट रोजी माजी नगरपरिषद सभापती छोटूभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आमदार करण देवतळे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले होते. यानंतर आमदार करण देवतळे आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत वरोरा एसडीओ कार्यालयात कोळसा खाण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत वेकोलि अधिकाऱ्यांनी ब्लास्टिंगच्या तीव्रतेमुळे होणाऱ्या झटक्यांच्या घटनांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही काळ झटक्यांचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र सोमवारी पुन्हा मोठ्या प्रमाणावर झटके जाणवल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. झटक्यांचे वास्तविक कारण शोधण्यासाठी तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वेकोलिच्या कोळसा खाणींमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळेच हे झटके येत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT