

Rajura Noise Pollution
चंद्रपूर : सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना डीजे व साऊंड सिस्टीम वाजवून ध्वनीप्रदूषण तसेच शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राजुरा पोलिसांनी धडक कारवाई केली. नवीन बसस्थानकासमोर करण्यात आलेल्या कारवाईत डीजे साहित्य आणि महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण १ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
१४ सप्टेंबर रोजी राजुरा येथील नवीन बसस्टॉपसमोर एका वाहनावर बेकायदेशीररीत्या डीजे सुरू असल्याची गोपनीय माहिती राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH-34-BZ-5017 वर डीजे वाजविण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले.
पोलिसांनी वाहनचालक व मालकाकडे डीजे अथवा वाद्य वाजविण्याचा अधिकृत परवाना आहे का, याची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टीम लावून ध्वनीप्रदूषण करणे आणि शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी डीजे साहित्य व वाहन जप्त केले.
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ७३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ मधील कलम ३८ व १३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत रवि सतीश एकनकर (२८), व्यवसाय डीजे मालक/ऑपरेटर, रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारशा आणि सचिन इन्चुलाल सरोज (२२), व्यवसाय चालक, रा. पंडित दीनदयाल वार्ड, बल्लारशा, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईत डायनॉटीक कंपनीचे दोन साऊंड टॉप, क्रीश कंपनीचे चार साऊंड बेस, क्राउन कंपनीची एक मशीन, कॉईनर कंपनीचा एक मिक्सर, किर्लोस्कर कंपनीचा एक जनरेटर आणि महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी १२ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तसेच विनापरवाना डीजे वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजुरा पोलिसांनी दिला आहे.