Chandrapur Waghya Turmeric GI Tag
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण ‘वाघ्या हळद’ला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी वरोरा तालुक्यातील बोडखा आणि बारव्हा गावांना भेट देत हळद उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, विपणन आणि GI टॅगसंदर्भातील विविध बाबींचा आढावा घेत शेतकऱ्यांना प्रशासनाच्या सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.
चंद्रपूर जिल्ह्याची ओळख असलेल्या ‘वाघ्या हळद’च्या गुणवत्तेमुळे तिला देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण होण्याची क्षमता असल्याचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी यावेळी नमूद केले. हळदीचे उत्पादन वाढविण्याबरोबरच तिचे मूल्यवर्धन, आकर्षक पॅकेजिंग आणि प्रभावी विपणन यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी हळद लागवडीच्या विविध टप्प्यांची माहिती घेतली. शेतकऱ्यांकडून उत्पादन प्रक्रियेतील अडचणी, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील अस्थिरता, साठवणुकीच्या सुविधा आणि विक्री व्यवस्थेतील समस्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडत प्रशासनाकडून आवश्यक मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देत शेतकऱ्यांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट केले. तसेच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाधारित शेती पद्धती आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच निर्माण करण्यासाठी प्रशासन आवश्यक सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
‘वाघ्या हळद’ला भौगोलिक मानांकन अर्थात GI (Geographical Indication) Tag मिळवून देण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया गतीमान करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. GI टॅग प्राप्त झाल्यास या हळदीची वेगळी ओळख निर्माण होऊन तिचे ब्रँडिंग अधिक प्रभावी होईल. परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, हळद उत्पादक शेतकरी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘वाघ्या हळद’ला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांना गती मिळत असल्याचे चित्र या दौऱ्यातून दिसून आले.
◾उत्पादनाची भौगोलिक व पारंपरिक ओळख जपली जाते.
◾बनावट उत्पादनांवर नियंत्रण ठेवता येते.
◾राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रँड मूल्य वाढते.
◾शेतकऱ्यांना उत्पादनाचा अधिक चांगला दर मिळण्यास मदत होते.
◾निर्यातीच्या संधी वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते.