Chandrapur Illegal Cylinder Refilling Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | चंद्रपुरात कमी वजनाच्या गॅस सिलेंडरचे रिफिलिंग करणाऱ्या गोदामावर धाड

प्रत्येक सिलेंडरमधून सुमारे २ किलो गॅस काढल्याचा आरोप; ३२ सिलेंडर जप्त, मोठे रॅकेट उघडकीस आल्याचा आम आदमी पक्षाचा दावा

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Illegal Cylinder Refilling

चंद्रपूर: घरगुती गॅस सिलेंडरमध्ये निर्धारित वजनापेक्षा कमी गॅस भरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कोसारा परिसरातील एका गोदामावर धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर सिलेंडर निर्धारित वजनापेक्षा कमी वजनाचे आढळून आल्याचा दावा पक्षाने केला आहे. प्रत्येक सिलेंडरमधून सुमारे दोन किलो गॅस काढला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर लवकर संपत असल्याच्या तसेच निर्धारित वजनापेक्षा कमी गॅस मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची माहिती घेतल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी सुमारे १२.३५ वाजता कोसारा परिसरातील एका हवेलीशेजारी असलेल्या गोदामावर अचानक धाड टाकली.

कारवाईदरम्यान संबंधित पुरवठा निरीक्षक, तहसील प्रशासन तसेच पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. गोदामाची तपासणी केली असता पहिल्या खोलीत आठ सिलेंडर आढळले. त्यापैकी दोन घरगुती एलपीजी सिलेंडर असून ते भारत गॅस आणि एचपी गॅस कंपनीचे असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सिलेंडर व्यावसायिक वापराचे होते. दुसऱ्या खोलीतही सहा घरगुती व व्यावसायिक सिलेंडर आढळले.

या सिलेंडरचे वजन तपासले असता ते निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. तसेच गोदामासमोर उभ्या असलेल्या एमएच-३४-एबी-९०९४ क्रमांकाच्या भाड्याच्या फोर्स वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये आणखी १८ सिलेंडर आढळले. या सिलेंडरचे नेट वजन २९ ते ३२ किलोदरम्यान असल्याचे सांगण्यात आले. बहुतांश सिलेंडर एचपी कंपनीचे व्यावसायिक सिलेंडर असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

सर्व सिलेंडरचे सिरीयल क्रमांक, ग्रॉस वजन आणि नेट वजन यांची नोंद पंचनाम्यात करण्यात आली. घटनास्थळी रोख रक्कम, काही कागदपत्रे व इतर साहित्यही आढळून आल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण कारवाईचा पंचनामा पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आला.

दरम्यान, घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडून चौकशीदरम्यान शहरातील इतर काही गॅस एजन्सींमध्येही अशाच प्रकारे कमी वजनाचे सिलेंडर तयार करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती मिळाल्याचा दावा पक्षाने केला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका गोदामापुरते मर्यादित नसून शहरात मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पक्षाने व्यक्त केली आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

ग्राहकांच्या हक्काच्या गॅस सिलेंडरमध्ये फेरफार करून कमी वजनाचा सिलेंडर देणे हा गंभीर गैरप्रकार असून, यामुळे आर्थिक फसवणुकीसोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका आम आदमी पक्षाने मांडली. अनधिकृत पद्धतीने गॅस रिफिलिंग करताना दुर्घटना घडण्याची शक्यताही असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार शहरातील इतर गॅस एजन्सींचीही चौकशी करण्यात यावी आणि या कथित रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील गॅस एजन्सी व वितरण व्यवस्थेची नियमित तपासणी मोहीम राबविण्याची मागणीही करण्यात आली.

या कारवाईत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, जिल्हा पदाधिकारी विशाल बिरमवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT