चंद्रपूर : घुग्घूसजवळील बेलोरा पुलावर आज शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. चड्डा ट्रान्सपोर्टचा १८ चाकांचा मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच -34 बी झेड 402) पुलावरील रेलिंग तोडत थेट सुमारे १०० फूट खोल वर्धा नदीच्या पात्रात कोसळला. या दुर्घटनेत ट्रक चालक राजा यादव (वय ४०) रा. शास्त्री नगर, घुग्घूस) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच -34 बी झेड 402) वेकोलीच्या नायगाव कोळसा खाणीच्या दिशेने कोळसा भरण्यासाठी जात होता. सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ट्रक बेलोरा पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रक थेट पुलावरील रेलिंग तोडून खोल वर्धा नदीत कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की संपूर्ण ट्रकचा समोरचा भाग पूर्णपणे चुरडून गेला व चालक केबिनमध्ये अडकून राहिला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर प्रशासनास कळविण्यात आले. स्थानिक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गॅस कटरच्या सहाय्याने ट्रकचे केबिन कापण्याचे काम सुरू करण्यात आले. जवळपास पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चालक राजा यादव याला बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत तो गंभीर जखमी अवस्थेत होता.
राजा यादव याला तातडीने घुग्घूस येथील राजीव रतन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक अतिशय वेगात होता आणि अचानक नियंत्रण सुटल्यामुळे चालकाला सावरायला वेळच मिळाला नाही. पुलावर काही सेकंदातच अपघात घडला आणि ट्रक खोल नदीत कोसळला. या अपघातामुळे काही काळ बेलोरा पुलावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.