

चंद्रपूर : चंद्रपूर-अहेरी मार्गावर आज शुक्रवारी (दि.13) सकाळच्या सुमारास गणपूर गावाजवळ एक भीषण अपघात घडला. पिकअप आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. संदीप कुलमेथे आणि रमेश वाढई असे मृतांचे नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करत असताना पिकअप आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात संदीप कुलमेथे आणि रमेश वाढई या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गणेश मडावी हा गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करून मृतक व जखमींना बाहेर काढले. जखमी मडावी याला रुग्णालयात हलविले. दरम्यान, ओव्हरटेक करताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.