Chandrapur Ashram school seed balls: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या ८ शासकीय आश्रमशाळा व २४ अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी तब्बल २ लाख सीडबॉल तयार केले. Pudhari
चंद्रपूर

Chandrapur news : आदिवासी विद्यार्थ्यांनी तयार केले २ लाख सीडबॉल!

रिमझिम पावसात जंगल, डोंगर व मोकळ्या जागांवर सीडबॉलचा वर्षाव, पर्यावरण संवर्धनासाठी आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Ashram school seed balls

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या ८ शासकीय आश्रमशाळा व २४ अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी तब्बल २ लाख सीडबॉल तयार केले.

पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण होण्‍यासाठी उपक्रम

आदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले अतूट संबंध, जंगलाबद्दलची आत्मीयता आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा लक्षात घेऊन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आखण्यात आला. आदिवासी समाज हा निसर्गपूजक असून पर्यावरणाचे रक्षण करणे ही त्यांची जीवनशैली आहे. या संस्कारांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये अधिक दृढ व्हावी आणि त्यांच्यामध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

मार्च महिन्यापासूनच नियोजन

गेल्या काही वर्षांत वाढती जंगलतोड, कमी होत जाणारे वनक्षेत्र, बदलते हवामान आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ वृक्षारोपण न करता नैसर्गिकरीत्या वृक्षसंवर्धनाला चालना देणाऱ्या सीडबॉल संकल्पनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मार्च महिन्यापासूनच संपूर्ण नियोजन सुरू करण्यात आले.

प्रत्येक शाळेला ५ हजार ते १० हजार सीडबॉल तयार करण्याचे उद्दिष्ट

शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या फावल्या वेळेत कडुलिंब, सुबाभूळ, सीताफळ, जांभूळ, आंबा तसेच विविध स्थानिक वृक्षांच्या बियाण्यांचे संकलन करण्यात आले. त्यानंतर माती, शेणखत आणि बियाण्यांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या हस्ते सीडबॉल तयार करण्यात आले. प्रत्येक शाळेला ५ हजार ते १० हजार सीडबॉल तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

सर्व आश्रमशाळांनी मिळून तयार केले सुमारे २ लाख सीडबॉल

या उपक्रमात मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून घेत अत्यंत उत्साहाने सीडबॉल तयार केले. या सामूहिक प्रयत्नातून प्रकल्पांतर्गत सर्व आश्रमशाळांनी मिळून सुमारे २ लाख सीडबॉल तयार करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी घेतला उपक्रमात सहभाग

२८ जुलै रोजी रिमझिम पावसाच्या साक्षीने सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांच्या परिसरात, मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा, डोंगराळ भागात, जंगल परिसरात तसेच गावातील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात सीडबॉलचे विसर्जन केले. पावसाच्या पाण्यामुळे या सीडबॉलमधील बियाणे अंकुरित होऊन त्यांचे रोपट्यांमध्ये रूपांतर होईल आणि भविष्यात हजारो वृक्ष उभे राहण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

पुढील वर्षी ५ लाख सीडबॉल तयार करण्याचे उद्दिष्ट

आदिवासी विद्यार्थ्यांच्या श्रम, सहभाग आणि निसर्गप्रेमातून उभी राहिलेली ही हरित मोहीम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, भविष्यात चंद्रपूर जिल्ह्याचा हरित वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचे योगदान देईल. हा उपक्रम दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्व आश्रमशाळांमध्ये नियमितपणे राबविण्यात येणार असून पुढील वर्षी ५ लाख सीडबॉल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT