Chandrapur Tiger Attack 
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack | नागभीड तालुक्यात वाघाचा थरारक हल्ला; मोहफुले वेचायला गेलेला शेतकरी ठार!

मींथुर येथे शेताजवळील नाल्यात आढळले मृतदेहाचे अवशेष; वाघांची जोडी व तीन बछडे असल्याचा संशय, वनविभाग-पोलीस तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मींथुर येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहफुले वेचण्यासाठी शेतात गेलेले हरिदास महादेव कुबडे (वय ५८) हे शनिवारी संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने शोध घेतला असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी शेताजवळील नाल्यात त्यांचे अवशेष आढळून आले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागभीड तालुक्यातील मींथुर गावातील रहिवासी हरिदास महादेव कुबडे (५८) हे शनिवारी (दि. ४ एप्रिल) सकाळी लवकर शेतात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. दिवसभरानंतरही ते घरी परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास त्यांचा पुतण्या अक्षय कुबडे हा त्यांना शोधण्यासाठी शेताच्या दिशेने गेला.

शेताजवळ पोहोचताच त्याला अचानक वाघांची जोडी आणि त्यांच्यासोबत तीन बछडे दिसून आले. एवढ्या जवळ वाघ दिसल्याने अक्षय घाबरून गेला आणि तात्काळ गावाकडे परतत ही माहिती ग्रामस्थांना दिली. गावकऱ्यांनी लगेचच ही बाब वनविभाग व पोलिसांना कळविली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र रात्री सुमारे ९ वाजेपर्यंत हरिदास कुबडे यांचा कुठेही मागमूस लागला नाही. त्यामुळे वाघाच्या हल्ल्याचा संशय अधिक बळावला.

दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम दरम्यान शेताजवळील एका नाल्यात मानवी अवयवांचे तुकडे आढळून आले. प्राथमिक पाहणीमध्ये वाघाने हल्ला करून शेतकऱ्याचे शरीर फस्त केल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचे अवशेष अत्यंत विदारक अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार त्या परिसरात किमान चार ते पाच वाघ असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामध्ये वाघाची जोडी आणि तीन बछडे असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना जंगलाच्या परिसरात जाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या वन परिशेत्र अधिकारी बगमारे यांनी मृतदेहाचे अवशेष तात्काळ नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. या घटनेबाबत पुढील तपास वनविभाग आणि नागभीड पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT