

Talodhi forest range tiger killing woman
चंद्रपूर : तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील सावरला जंगल परिसरात बुधवारी (दि. २५ ) सकाळी वाघाने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सरपणासाठी जंगलात गेलेल्या प्रमिला अरुण वाडगुरे (वय ४६, रा. तळोधी बाळापुर, चिटणीसपुरा) यांच्यावर वाघाने अचानक झडप घालून हल्ला केल्याने त्या जागीच ठार झाल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
तळोधी वनपरिक्षेत्रातील सावरला तलावाजवळील कक्ष क्रमांक ८९ मध्ये आज बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. प्रमिला अरुण वाडगुरे या नेहमीप्रमाणे गावातील पाच ते सहा महिलांसोबत जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी सुमारे पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सर्व महिलांनी सरपण जमा करून परतण्याची तयारी सुरू केली होती.
याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक प्रमिला वाडगुरे यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा करत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने महिलांमध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वन विभागाला तात्काळ कळविण्यात आले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास व कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, संबंधित परिसरात वाघाचा वावर वाढल्याचे लक्षात घेऊन वन विभागाने गस्त वाढवली आहे. नागरिकांनी जंगलात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे सावरला आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.