चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात काल वाघाच्या हल्ल्यात अल्का पेंदोर या महिलेला प्राण गमवावा लागला. या घटनेनंतर आज सोमवारी गोंडपिपरी शहरासह परिसरातील नागरिक संतप्त झाले. सकाळी आठ वाजल्यापासून हजारो नागरिकांनी अहेरी–चंद्रपूर हा मुख्य मार्ग रोखून धरला. तब्बल नऊ तास सुरू राहिलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे संपूर्ण परिसर ठप्प झाला. शेवटी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथे रविवारी अल्का पेंदोर (वय ३५) या महिला शेतात काम करत असताना अचानक वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला. या घटनेनंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेत रात्रीभर आंदोलन सुरू ठेवले.
आज सोमवारी सकाळी हा संताप आणखीनच तीव्र झाला. सकाळी आठ वाजताच गोंडपिपरी तसेच आसपासच्या अनेक गावांतील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने गोंडपिपरीच्या मुख्य चौकात एकत्र जमले. काही वेळातच हजारो लोकांनी अहेरी–चंद्रपूर हा प्रमुख मार्ग दोन्ही बाजूंनी बंद केला. रस्त्यावर टायर जाळून आणि घोषणाबाजी करत संतप्त नागरिकांनी वनविभागाविरोधात जोरदार निषेध नोंदविला.
रात्री वनविभाग आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे आज सकाळी वनअधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. संतप्त नागरिकांनी गोंडपिपरी शहरातील सर्व दुकाने आणि बाजारपेठ बंद केली. या दरम्यान पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक तसेच विशेष फोर्सला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अनेकदा समन्वय साधण्याचे प्रयत्न झाले, पण ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम होते. अखेर सायंकाळी सुमारे पाच वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, तसेच प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्यांना मान्यता देत वाघाला दोन दिवसांच्या आत जेरबंद करण्याचे आश्वासन दिले. या हमीनंतर नऊ तासांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
वाहतूक कोलमडली, जनजीवन विस्कळीत
या चक्काजाममुळे अहेरी–चंद्रपूर या मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागले. चंद्रपूर, मूल, अहेरी, सिरोंचा या मार्गावरील वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला.
शार्प शूटर दाखल ; दोन दिवसांत वाघ पकडण्याची ग्वाही
दरम्यान, सायंकाळी वाघाला बेशुद्ध करण्यासाठी अविनाश फुलझेले यांच्या नेतृत्वात दोन अनुभवी शार्प शूटर गोंडपिपरीत दाखल झाले. “या वाघाला आम्ही बेशुद्ध करून पकडणारच,” अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. गोंडपिपरीतील ही घटना केवळ एका महिलेला वाघाने ठार मारल्याची नाही, तर ग्रामीण जनतेच्या वाढत्या असुरक्षिततेचा आणि प्रशासनावरील अविश्वासाचा तीव्र स्फोट आहे. आता सर्वांचे लक्ष वनविभागाने दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीकडे लागले आहे — वाघ जेरबंद होतो का, की पुन्हा एखाद्या निष्पापाचा बळी घेतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.