

चंद्रपूर : शुक्रवारी शेतकऱ्याचा बळी घेतलेल्या नरभक्षक वाघाने आता थेट आकापुर गावात एन्ट्री करून नागरिकांना चांगलेच भयभीत केले आहे. रविवारच्या मध्यरात्री वाघाने गावात प्रवेश करून एका कुत्र्याची शिकार केली. त्यामुळे पुन्हा एकदा गावात प्रचंड दहशत आणि कल्लोळ उडाला असून नागरिक भीतीच्या छायेत आहेत. वाघाचा थरार कायम आहे, दररोज नवनवीन वाघाच्या हालचाली पहायला मिळत आहेत.
नागभीड तालुक्यातील आकापुर गावातील शेतकरी वासुदेव लक्ष्मण वेटे (वय ५५) हे शुक्रवारी सायंकाळी स्वतःच्या शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवित ठार केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह त्याच शेतशिवारात आढळून आला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाला घेराव घालून तात्काळ वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. जवळपास तीन ते चार तास तणावपूर्ण परिस्थिती होती. शेवटी वनविभागाने आकापूर गाव व शेतशिवारात बंदोबस्त वाढविला.
वनविभागाने तळोधी.(बा.) वनपरिक्षेत्र कार्यालयानंतर्गत आकापूर शेत शिवारात ८ ट्रॅप व लाईव्ह कॅमेरे बसवले असून १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी वनकर्मचाऱ्यांच्या सोबत जाण्याची सूचना देण्यात आली. शनिवारी रात्री पुन्हा वाघाने पुन्हा शेतकऱ्याला ठार केलेल्या घटनास्थळी येऊन गेला. त्याच्या हालचाली ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये टिपल्या गेल्या, त्यामुळे विभाग सतर्क झाला होता. मात्र, रविवारच्या मध्यरात्री वाघाने थेट गावात प्रवेश करून धर्माजी नान्हे यांच्या कुत्र्याची शिकार केल्याने खळबळ उडाली आहे.
रात्री वाघाच्या डरकाळी आणि कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावकरी जागे झाले. काहींनी मोबाईलच्या टॉर्चने बाहेर पाहिले असता वाघ गावातून जाताना दिसल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून अनेकांनी रात्रभर जागून रात्र काढल्याची माहिती समोर येत आहे. गावात सध्या "अंधार होताच घराबाहेर न जाण्याची" सक्त ताकीद दिली जात आहे. महिला व लहान मुलं तर विशेषतः घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. वाघाने ट्रॅप कॅमेऱ्यांना चकमा देत गावात प्रवेश केल्याने वनविभागाची चिंता वाढली आहे. विभागाने आता गाव परिसरात अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. वनविभाग वाघावर ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे सतत नजर ठेवून आहे, वाघ कोणत्या दिशेने हालचाल करतोय याचे विश्लेषण सुरू आहे. गावकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन वनविभाग करीत आहे.
शनिवारच्या रात्री घटनास्थळी अणि रविवारच्या रात्री गावात वाघाची एन्ट्री झाल्याने नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. आमच्या शेतात काम करणे तर दूर, आता गावातही सुरक्षित वाटत नाही. वनविभागाने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत. शेतकऱ्याचा जीव घेणारा हा नरभक्षक वाघ आता गावातही शिरत असल्याने आकापुरात भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. वनविभागाकडून यावर तातडीने ठोस कारवाई न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.Tiger