Chandrapur Tiger Attack Pudhari photo
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack |अंगाचा थरकाप उडवणारे दृश्यः चंद्रपूर जिल्ह्यात क्रूर वाघाने केले शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे

वनाधिकारी घटना पाहून स्तब्ध : वनविभागाकडून शरीराचे तुकडे गोळा करण्याचे काम सुरू

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Tiger Attack | Shocking Scene: Ferocious Tiger Mauls Farmer to Death in Chandrapur District

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची थरकाप उडवणारी घटना आज रविवारी समोर आली आहे.  गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा निर्घृणपणे जीव घेतला आहे. अधिक भीषण बाब म्हणजे, वाघाने शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते तुकडे शेत परिसरात विखुरलेले अवस्थेत सापडले आहेत. ही घटना समजताच वनविभाग, पोलिस पथक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सध्या वनविभागाकडून मृतदेहाचे विखुरलेले अवयव एकत्र करण्याचे कार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवार) सकाळी भाऊजी पाल हे नेहमीप्रमाणे आपल्या बैलांना शेतात चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यांनी बैलांना चारण्यासाठी मोकळे सोडले आणि घरी परत आले. सायंकाळी ते पुन्हा बैलांना परत आणण्यासाठी शेताकडे गेले, परंतु ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही.

आज (रविवार) सकाळी कुटुंबीयासह गावकऱ्यांनी शोधमोहीम पुन्हा सुरू केली असता, शेताच्या परिसरात भीषण दृश्य दिसले. शेतकऱ्याच्या शरीराचे अनेक तुकडे विविध ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले. यामुळे गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

वाघाने शरीराचे तुकडे तुकडे केल्याच्या या प्रकारामुळे वनविभागाचे अधिकारीसुद्धा स्तब्ध झाले आहेत. ही घटना अतिशय दुर्दैवी असून अशा प्रकारे शरीराचे तुकडे विखुरले जाण्याची घटना या भागात पहिल्यांदाच घडली आहे. सदर परिसरात वनविभागाने पथक तैनात केले असून वाघाचा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिसरातील गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोंडपिपरी तालुक्यात याआधी वाघाच्या हल्ल्याची अशी घटना समोर आली नव्हती. मात्र आता या क्रूर घटनेनंतर शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक गावांमध्ये लोक शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत. सध्या सोयाबीन आणि कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे त्यामध्ये ही घटना समोर आल्याने आता या हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी, पोलिस, आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित आहेत. अर्धा किलोमीटर परिसरात विखुरलेले शरीराचे अवशेष गोळा करून पोस्टमार्टमसाठी शवविच्छेदन केंद्रात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या क्रूर घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. ही ‘क्रूर घटना’ पाहून नागरिक, वनाधिकारी आणि पोलिस सर्वच थरारले आहेत. जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

गोंडपिपरीसारख्या ग्रामीण भागात बऱ्याच वर्षांपासून वाघाच्या घटना घडलेल्या नव्हत्या, परंतू आज रविवारी उघडते झालेल्या या घटनेमुळे आणि वाघांच्या प्रवेशाने शेतकरी समुदाय अस्वस्थ झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT