Tiger Attack File Photo
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack: चंद्रपूर हादरले! सिंदेवाहीत वाघाचा काळजाचा थरकाप उडवणारा हल्ला, ४ महिलांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला.

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Tiger Attack

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा भीषण स्वरूपात समोर आला आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत गुंजेवाही परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना आज (दि. २२) घडली. कवडाबाई दादाजी मोहुर्ले (वय ४५), अनिताबाई दादाजी मोहुर्ले (वय ४०), सुनीता कौशिक मोहुर्ले (वय ५०) असे मृत महिलांची नावे आहेत. या सर्व गुंजेवाही येथील रहिवासी होत्या.  

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही याच महिन्यात आणि याच वनपरिक्षेत्रात अशाच प्रकारे तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे सिंदेवाही परिसरातील मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही  तालुक्यातील गुंजेवाही येथील कवडाबाई मोहुर्ले, अनिताबाई मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले या महिला आज सकाळी जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला इतका भीषण होता की चार महिलांचा एका पाठोपाठ जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर जंगल परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनविभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, याच सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव उपक्षेत्रात मागील वर्षी १० मे २०२५ रोजी मेंढामाल येथील तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या महिलाही तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केला होता. आता जवळपास वर्षभरानंतर पुन्हा त्याच महिन्यात आणि अवघ्या १२ दिवसांच्या कालावधीच्या फरकाने अशीच भीषण घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे.

वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात महिला आणि मजूर जंगलात जात आहेत. मात्र सलग घडणाऱ्या वाघांच्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, संबंधित वाघाला जेरबंद करावे तसेच मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत वाघांच्या हल्ल्यात तब्बल १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT