Talodhi Balapur Tigress captured
चंद्रपूर : तळोधी (बा.)वनपरिक्षेत्रातील तळोधी उपक्षेत्रात मौजा बाळापुर व येनोली परिसरात मागील पंधरा दिवसांपासून शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या T-139 SAF (मादी) वाघिणीस पकडले. वनविभागाच्या पथकाने शनिवारी (दि. 28) सकाळी 11.35 वाजता मौजा बाळापूर येथील कक्ष क्रमांक 168 (संरक्षित वनक्षेत्र) मध्ये वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले.
वाघीणीचे अंदाजे वय सुमारे 20 महिने असल्याची माहिती वनविभागाने दिली. तळोधी (बा.), येणोली शेतशिवारात वाघिणीचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने विशेष पथक तैनात करून वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते.
ही कारवाई ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहायक वनसंरक्षक (तेंदू), एम. बी. गायकवाड, सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) अरविंद जे., वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) ए. आर. कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक ए. जी. मने व इतर क्षेत्रीय वन कर्मचारी सहभागी होते.
याशिवाय ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील RRT पथकाचे डॉ. रविकांत खोब्रागडे (पशुवैद्यकीय अधिकारी), अजय मराठे (पोलीस हवालदार व शुटर) व त्यांची चमू, तसेच बायोलॉजिस्ट राकेश आहुजा यांच्या उपस्थितीत ही मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
जेरबंद करण्यात आल्यानंतर वाघीणीची सखोल वैद्यकीय तपासणी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केली. तपासणीनंतर वाघीण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे.
जंगल परिसरात किंवा शेतशिवारात संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.