Tadoba Andhari Tiger Reserve
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या आघाडीच्या वन कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जुलै २०२६ चे ‘स्टार ऑफ द मंथ’ जाहीर करण्यात आले आहेत. वनसंरक्षणातील सतर्कता, पायी गस्त, अवैध कृत्यांना प्रतिबंध आणि वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करवा (कोअर) रेंजचे वनरक्षक रामकृष्ण प्रकाश हजारे आणि शिवणी (बफर) रेंजचे वनरक्षक एन. डी. शहारे यांचा या विशेष सन्मानाने गौरव करण्यात आला.
करवा (कोअर) रेंजमध्ये कार्यरत वनरक्षक रामकृष्ण प्रकाश हजारे यांनी जुलै महिन्यात वनसंरक्षणासाठी विशेष योगदान दिले. M-Stripe डेटानुसार त्यांनी सर्वाधिक पायी गस्त घालत जंगलातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यांच्या सातत्यपूर्ण गस्तीमुळे जंगलातील संवेदनशील भागांवर प्रभावी देखरेख ठेवण्यास मदत झाली.
हजारे यांनी अवैध बांबू कटाई रोखण्यासाठी प्रभावी कारवाई केली असून, शिकारीसारख्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सातत्याने निगराणी ठेवली. वनक्षेत्रात कोणतीही संशयास्पद हालचाल होऊ नये यासाठी त्यांनी नियमित गस्त आणि निरीक्षणावर भर दिला. याशिवाय फायकस (Ficus) आणि फळझाडांच्या लागवडीचे काम, तसेच KRAS अंतर्गत सोपविण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यामध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
शिवणी (बफर) रेंजमध्ये कार्यरत वनरक्षक एन. डी. शहारे यांनीही जुलै महिन्यात वनसंरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. M-Stripe डेटानुसार त्यांनी तब्बल १२१.९७५ किलोमीटर पायी गस्त घातली. या माध्यमातून आपल्या बीटमधील जंगल आणि वन्यजीवांच्या सुरक्षेवर त्यांनी प्रभावी लक्ष ठेवले.
शहारे यांनी वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती केली. वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणे, जंगल परिसरात आवश्यक ती खबरदारी घेणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, त्यांच्यावर सोपविण्यात आलेली सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून त्यांनी कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण घालून दिले.
ताडोबाच्या विस्तीर्ण जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल यांसह विविध वन्यजीवांचे संरक्षण करताना वन विभागातील फ्रंटलाइन कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने काम करतात. जंगलातील दुर्गम भागात पायी गस्त घालणे, अवैध शिकार व वृक्षतोडीवर लक्ष ठेवणे, वन्यजीवांच्या हालचालींची नोंद करणे तसेच स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. या पार्श्वभूमीवर ‘स्टार ऑफ द मंथ’ हा उपक्रम उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची दखल घेणारा आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे.