Chandrapur Wife Assault Husband Arrested
चंद्रपूर : प्रेमविवाह करून अवघे २० दिवस झाले असतानाच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने मित्राच्या मदतीने तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गापूर येथील हसन ऊर्फ अल्ताफ सलीम शेख (वय २६) याने ६ ऑगस्ट रोजी संबंधित महिलेशी नोंदणी विवाह केला होता. दोघे भिन्न धर्मीय असल्याने विवाहानंतर पत्नी हसनच्या घरी न राहता आईसोबत राहत होती. दरम्यान, दोन्ही कुटुंबांकडून रीतीरिवाजानुसार विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती. मात्र, पत्नीच्या भ्रमणध्वनीवर वारंवार अनोळखी व्यक्तींचे फोन येत असल्याचे तसेच तिचा फोन व्यस्त येत असल्याचे कारण पुढे करत हसनच्या मनात संशय निर्माण झाला. या संशयातून दोघांमध्ये वाद होऊ लागल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
२५ ऑगस्ट रोजी हसनने पत्नीला फोन केला असता तिचा फोन व्यस्त होता. त्यामुळे तो थेट तिच्या घरी पोहोचला. त्यावेळी ती भ्रमणध्वनीवर बोलत होती. हसनने तिच्या हातातील फोन घेत समोरच्या व्यक्तीशी संवाद साधला. त्यानंतर संतापाच्या अवस्थेत तो तेथून निघून गेला.
काही वेळाने संबंधित महिला जवळच्या शिवणकला प्रशिक्षण केंद्रात गेली. दरम्यान, हसनने त्याचा मित्र कुणाल बोरकर (वय १९) याला दुचाकीवर सोबत घेतले आणि दोघे प्रशिक्षण केंद्रात पोहोचले. तेथून पत्नीला सोबत घेऊन ते वेकोलिच्या शक्तीनगर वसाहतीतील स्मशानभूमीत गेले.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, स्मशानभूमीत हसनने महिलेवर अत्याचार केला. तसेच मित्र कुणाललाही तिच्यावर अत्याचार करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर दोघेही तेथून निघून गेले.
घरी परतल्यानंतर मानसिक धक्क्यात असलेल्या पीडितेने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला घेऊन दुर्गापूर पोलीस ठाणे गाठले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हसन शेख आणि कुणाल बोरकर या दोघांना अटक केली.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, घटनेमागील कारणे आणि आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास केला जात आहे.