Chandrapur Vidyarthi Akrosh Satyagraha
चंद्रपूर : राज्यातील स्पर्धा परीक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी, MPSC ऑनलाइन परीक्षा व नॉर्मलायझेशन पद्धत, MAHAJYOTI, BARTI व TRTI संस्थांमधील कपात, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची मागणी, शासकीय नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण तसेच पोलिस शिपाई भरतीमध्ये सरळसेवा भरतीप्रमाणे ५ वर्षांची वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती, चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह' आंदोलन आज (दि.१४) करण्यात आले.
आंदोलनात विद्यार्थ्यांनी विविध घोषणाबाजी करत शासनाने विद्यार्थीविरोधी धोरणे तात्काळ मागे घ्यावीत, स्पर्धा परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड थांबवावी, अशी जोरदार मागणी केली. आंदोलनानंतर मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उद्देशून सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले.
निवेदनात MPSC मधील ऑनलाइन परीक्षा व नॉर्मलायझेशन पद्धत रद्द करून सर्व परीक्षा ऑफलाइन OMR पद्धतीने घेणे, NEET, TET व इतर पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा करणे, MAHAJYOTI, BARTI व TRTI मधील कपात रद्द करणे, राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करणे, शासकीय नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण बंद करून नियमित पदभरती करणे तसेच पोलिस शिपाई भरतीमध्ये सरळसेवा भरतीप्रमाणे ५ वर्षांची वयोमर्यादा वाढविण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा राज्यभर व्यापक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती, मुख्य संयोजक, डॉ. अनिल डहाके यांनी दिला. या आंदोलनात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती, मुख्य संयोजक,डॉ.अनिल डहाके, प्रमुख मार्गदर्शक नितेश कराळे, जितेंद्र पिंपळशेंडे, नंदू नागरकर, दत्ता बारगिरे, अजय दुर्गे, देवा पाचभाई,
श्रीकांत मद्दावार, मंगेश गौरकर, रोशन भोयर, ॲड.पुरुषोत्तम सातपुते, मनस्वी गिऱ्हे, स्थायी समिती अध्यक्ष मनपा, चंद्रपूर, नगरसेवक राहुल विरुटकर, सिद्धार्थ गायकवाड, संजय ढवस, श्याम बोबडे व हजारो विद्यार्थी उपस्थित होते. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह हे केवळ एक आंदोलन नाही तर विद्यार्थ्यांच्या वेदनेचा आवाज आहे. हा लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा संघर्ष आहे. अनेक विद्यार्थी शेतकरी, कामगार कुटुंबातील आहे. त्यांच्या न्याय मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.- डॉ. अनिल डहाके, मुख्य संयोजक, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती, चंद्रपूर