file photo  
चंद्रपूर

चंद्रपूर: भरधाव दुचाकीची दाम्पत्यास धडक; पती ठार, पत्नी जखमी

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: आठवडी बाजारातून मुख्य रस्त्याने पायी जाणाऱ्या एका दाम्पत्याला मागून भरधाव दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. यामध्ये पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नी जखमी झाली. मध्यप्राशन करून असलेल्या दुचाकीस्वारावर पोलिसांनी कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या जमावाने मृतदेह घेऊन पोलिस चौकीवर धडक देत कारवाईची मागणी केली. कारवाईकरीता पोलिसांनी टाळाटाळ केल्याने दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी रेटून धरली. ही घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. बाजार हा रस्त्यावरच भरतो. काल सोमवारी बाजार असल्याने रस्त्याने खूप गर्दी होती. बाजारातून मनोहर किसन चौधरी (वय 40) व पत्नी मिळून शेतावर पायी जात होते. मद्यप्राशन करीत दुचाकीस्वार अतुल शंभरकर यांनी भरधाव वेगात दुचाकी मागून धडक दिली. यामध्ये पती जागीच बेशुध्द झाला. पत्नी जखमी झाली. बाजारातील नागरिकांनी लगेच शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु प्रकृती खालावल्याने नागपूर हलविण्यात आले. आज मंगळवारी 11 वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शंकरपूर येथे आणण्यात आला.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीची दुचाकी जप्त केली. शिवाय तो मध्यप्राशन करून असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. शिवाय त्याला सोडून देण्यात आल्याने नागरिक प्रचंड संतापले होते. त्यामुळे आज मंगळवारी मनोहर चौधरी याचा मृतदेह घेऊन नागरिक पोलिस चौकीवर धडकले. पाचशेच्या वर नागरिकांनी धडक देत आरोपीला सोडून देणाऱ्या पोलिसांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे शंकरपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी माजी आमदार अविनाश वारजूकर, माजी जि. प. अध्यक्ष सतीश वारजुकर व उपसरपंच अशोक चौधरी, माजी सरपंच सविता चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वृत्तलिहिपर्यंत यावर तोडगा निघाला नव्हता. पोलिस चौकीत कार्यरत रायपुरे व पोलीस हवालदार वाघमारे यांना निलंबित केल्यानंतरच मृतदेह उचलू अशी भूमिका घेतली होती. ठाणेदार प्रकाश राऊत हे उपस्थित झाले नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT