Chandrapur Wildlife Attack Compensation Demand
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभाग आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत मृतदेह उचलण्यास विरोध केला. “आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही,” अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
शुक्रवारी (दि.२२) सकाळी घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जंगल परिसरात शोधमोहीम राबवून चारही महिलांचे मृतदेह शोधून काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला.
गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत अनेक मागण्या पुढे केल्या. त्यामुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांसोबत
संबंधित वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात यावी,तेंदूपत्ता संकलनावेळी वन विभागाचे कर्मचारी सोबत असावेत, गावाभोवती नियमित गस्त वाढविण्यात यावी, जंगलात जाणाऱ्या गावकऱ्यांना वन विभागाने सुरक्षा पुरवावी आदी मागण्या लावून धरल्या.
परिस्थिती चिघळत असल्याचे बघून वन विभागाने आणि प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्यांची पूर्तता करण्याची तयारी दर्शविली आणू सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चारही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आणि पुढील प्रक्रियेसाठी विच्छेदनाकरता रवाना करण्यात आले.
साडेबारानंतर तब्बल चार ते पाच तास कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय 45) अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय 46), संगीता संतोष चौधरी (वय 36), सुनीता कौशिक मोहुर्ले (वय 33) मृतदेह घटनास्थळी होते. त्यानंतर पोलिस आणि वन अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.
या चारही महिला तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू झाल्याने गुंजेवाहीसह जंगला लगतच्या गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या कामावर अवलंबून आहे. मात्र सलग वाढणाऱ्या वाघांच्या हल्ल्यांमुळे जंगलात जाण्यास ग्रामस्थ घाबरू लागले आहेत. त्यामुळे यंदाच्या तेंदूपत्ता हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित वाघाला तातडीने जेरबंद करावे, गावाभोवती रात्री गस्त वाढवावी आणि जंगल परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.