Chandrapur News | सिंदेवाहीत काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा; विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा 
चंद्रपूर

Chandrapur News | सिंदेवाहीत काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा; विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी हजारोंचा सहभाग, न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सोमवारी सिंदेवाही येथे भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अन्याय, महागाई, बेरोजगारी तसेच शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोर्चादरम्यान विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जनतेच्या प्रश्नांकडे डोळेझाक करून सत्ता चालवता येणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम, कष्टकऱ्यांच्या श्रमाला सन्मान, महिलांना सुरक्षितता व न्याय, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी आणि तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

जनतेच्या हक्कांसाठी काँग्रेसचा आवाज विधानसभेपासून रस्त्यापर्यंत बुलंद राहील. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या महामोर्चामुळे सिंदेवाही शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारविरोधात आपला आक्रोश व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT