Savali Taluka 9 Year Old Boy Drowns
चंद्रपूर : सावली तालुक्यातील बोरमाळा गावातील ग्रामतलावात बुडून एका ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. धृप दिवाकर कारमेंगे (वय ९ ) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
सावली तालुक्यातील बोरमाळा येथे सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामतलाव परिसरात धृप दिवाकर कारमेंगे हा गेला असता तो अचानक पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मुलाला बाहेर काढण्याचा आणि त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहेत.
अवघ्या नऊ वर्षांच्या धृपच्या अकाली निधनाने बोरमाळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कारमेंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.