Chandrapur Accident News
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील वलनी गावातील मजूर सोयाबीन सोंगण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मनभा येथे जात होते. यावेळी समृद्धी महामार्ग क्र.११६ वर मंगळवारी ( दि. ७) पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा मजूर गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी रात्री ९ वाजता वलनी येथून १५ ते १६ मजूर मालवाहतूक वाहनातून कामासाठी सोयाबीन सोंगण्यासाठी निघाले होते. पहाटेच्या सुमारास रस्त्यावर दाट धुके होते. शिवणीजवळ लघुशंकेसाठी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्या वाहनाला जोरदार धडक दिली.
धडकेत वाहनातील सहा मजूर गंभीर जखमी झाले, तर मंदा प्रकाश नैताम (वय ४५) या महिलेला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी मध्ये राहुल पुराम, उर्मिला शेंदरे, अस्मिता भाना रकर, सविता शेंडे, मंदा नैताम, छत्रपती वासेकर आणि कमला ठाकरे यांचा समावेश आहे. हे सर्व मजूर नागभीड तालुक्यातील वलणी गावातील रहिवासी आहेत.
जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. धामणगाव (रेल्वे) पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
वलनी परिसरात पावसाळ्यानंतर धान रोवणी पूर्ण झाल्यावर काही महिन्यांसाठी कामाचा पूर्ण अभाव निर्माण होतो. शेतमजुरीखेरीज इतर रोजगाराच्या संधी जवळजवळ नाहीत. नागभीड तालुक्यात असलेल्या एमआयडीसीमध्ये अद्याप कोणतेही उद्योगधंदे उभे राहिले नाहीत. परिणामी, येथील गरीब व मजूर वर्गाला उदरनिर्वाहासाठी परजिल्ह्यात व परराज्यात जावे लागते. या स्थलांतरामुळे अनेकदा प्रवासादरम्यान किंवा परगावी अशा दुर्दैवी घटनांचा सामना करावा लागतो.