Rajura Congress Jan Aakrosh Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Congress Protest | राजुऱ्यात काँग्रेसचा भव्य ‘जनआक्रोश’; सरकारविरोधात घोषणाबाजी

शेतकरी, महिला सुरक्षा, बेरोजगारीसह मतदार यादीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक: खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, हनुमंत पवार यांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

Rajura Congress Jan Aakrosh

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, पेपरफुटी, स्मार्ट मीटर तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.२८) राजुरा शहरात भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात भवानी माता मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात खासदार प्रतिभा धानोरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान सरकारच्या विविध धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासह शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षा आणि बेरोजगारांना न्याय मिळावा, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करावी, पेपरफुटीच्या घटनांना आळा घालून बेरोजगारांना न्याय द्यावा, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी आणि इंधनाचे दर कमी करावेत, अशा मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

‘मतदार यादीत बोगस नावे समाविष्ट झाल्याचा’ धानोरकरांचा आरोप

राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत बोगस मतदारांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी केला. हा प्रकार वेळोवेळी स्पष्ट झाला असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यासंदर्भात पुरावे सादर केल्याचा दावा त्यांनी केला.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. निवडणूक आयोग आणि मतदार यादीशी संबंधित मुद्द्यांवर विरोधी पक्षांकडून अलीकडे अशाच प्रकारच्या मागण्या केल्या जात आहेत.

सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी आणि अन्यायाविरोधात हा संघर्ष असून जनतेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका मोर्चातील नेत्यांनी मांडली. मोर्चात राजुरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT