पापा जाधव  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime | राजुरातील भरदिवसा गोळीबार प्रकरणात सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’

हत्येचा कट रचणारे, प्रत्यक्ष गोळीबार करणारे व मदत करणाऱ्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Rajura Firing Case

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात भरदिवसा गोळीबार करून करण्यात आलेल्या विनोद ऊर्फ पापा जनार्धन जाधव यांच्या खळबळजनक हत्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्यांदाच मोक्का कायद्याचा वापर करण्यात आल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भरदिवसा गोळीबार करून हत्या

दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास सोमनाथपूर वार्ड, राजुरा येथील रहिवासी विनोद ऊर्फ पापा जनार्धन जाधव हे कोर्टासमोरील किरणकुमार साईला यांच्या नारळपाणी विक्रीच्या दुकानाजवळ मित्रांसोबत बसले होते. यावेळी इंदिरानगर, राजुरा येथील आरोपी करण दुर्गराज मेकलवार आणि करण दिपक बावीस्कर हे दुचाकीवरून तेथे आले. दोघांनीही चेहऱ्यावर दुपट्टा बांधला होता.

यातील करण दिपक बावीस्कर याने जवळील पिस्तुलातून विनोद जाधव यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात जाधव यांचा मृत्यू झाला. भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या हत्याकांडामुळे राजुरा शहरात खळबळ उडाली होती.

या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, २५, २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कट रचणाऱ्यांसह मदत करणारेही पोलिसांच्या जाळ्यात

गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने पूर्ण केला. तपासादरम्यान केवळ प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपींचाच शोध घेण्यात आला नाही, तर हत्येचा कट रचणे, अपप्रेरणा देणे तसेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या आरोपींचीही माहिती पोलिसांनी समोर आणली. या प्रकरणात परवेज सरवर शेख, कार्तिक उमेश खामनकर आणि सौरभ ऊर्फ भुर्जी उमेश खामनकर यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून पोलिसांनी तीन अग्निशस्त्रे, तीन रिकाम्या मॅग्झिन आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

सराईत गुन्हेगारांची संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मोक्का

तपासात अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या अभिलेखातून समोर आले. आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच संघटित गुन्हेगारीची साखळी मोडून काढण्यासाठी राजुरा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.

हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या गुन्ह्यात MCOCA चे कलम लागू करण्यास रीतसर मंजुरी दिली आहे.

राजुरा पोलिसांच्या हद्दीत पहिल्यांदाच मोक्का कायद्यांतर्गत झालेल्या या कारवाईमुळे गंभीर आणि संघटित स्वरूपाच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे आणि पोलीस हवालदार कैलास आलाम यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रे व काडतुसे जप्त झाल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासाला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT