चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटू लागले असून वन्यप्राण्यांसमोर पाण्याचे गंभीर संकट निर्माण होत आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याच्या घटना वाढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ताडोबा बफर झोन परिसरात वन्यप्राण्यांसाठी १६ पाणवठे तयार केले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यापासूनच उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. सध्या 45 अंशापार तापमान चढत आहे. वाढत्या तापमानामुळे जंगलातील अनेक नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले आहेत. परिणामी वाघ, बिबट, सांबर, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राणी पाण्यासाठी जंगलाबाहेर येताना दिसत आहेत. अनेकदा हे प्राणी मानवी वस्तीत शिरल्याने अपघात, शिकारी किंवा मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता निर्माण होत आहे.
काही दिवसापूर्वीच हरणाची जोडी चंद्रपुरात रस्त्यावर फिरतानाचा एक व्हिडिओ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निदर्शनास आला. या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जंगल परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या सूचना दिल्या.
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्ते तातडीने कामाला लागले. चंद्रपूर शहरालगत असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील लोहारा जंगल परिसरात तब्बल १६ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पाणवठ्यावर नियमित पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमामुळे जंगलातील वन्यजीवांना सुरक्षित ठिकाणी पाणी उपलब्ध होणार असून त्यांचा मानवी वस्तीकडे होणारा ओढा काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव ठेवत मनसे कार्यकर्त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे पर्यावरण प्रेमी कडून कौतुक केले जात आहे.