चंद्रपूर : चांदाफोर्ट ते नागभिड मार्गावरील केळझर ते मुल मारोडा दरम्यान एका अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (25 मे) सकाळी घडली. वनविभागाने अस्वलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.
सुत्रांनुसार, चांदाफोर्ट ते गोंदिया मार्गावरील दैनंदिन रेल्वे चालतात. या रेल्वे मार्गाचा बराचसा भाग हा जंगलातून जातो. या जंगलात विविध प्रकारचे वन्यप्राणी आहे. या जंगलातून वन्यप्राण्यांची भ्रमंती सुरू असते. रेल्वे मार्ग हा जंगलातून गेला असल्यामुळे रेल्वे मार्गादरम्यान बऱ्याच वन्यप्राण्यांचा मार्ग ओलांडताना मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत आहेत. आज रविवारी सकळाी सातच्या सुमारास चांदाफोर्ट रेल्वे ही गोंदियाला जात असताना केळझर ते मुल मारोडा मार्गादरम्यान एका अस्वलाचा दरभंगा एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती वनविभागाला होताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन अस्वलाचा मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करुन अस्वलाच्या मृतदेहाचे सोपस्कार पार पाडले. या रेल्वे मार्गावर वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. यापूर्वीही बरेच वन्यप्राण्यांचे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेले आहेत. रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचे मृत्यू होत असल्याने वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.