पिपरी दीक्षित गावाजवळील जंगलात एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळला खळबळ  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Tiger Death | पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

फॉरेन्सिक अहवालानंतरच गूढ मृत्यूचे कारण उलगडणार

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Decomposed Tiger Carcass Found

चंद्रपूर : पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील पिपरी दीक्षित गावाजवळील जंगलात एका प्रौढ वाघाचा मृतदेह शनिवारी (दि.२०) सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या या वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदनानंतरही वन विभागाला मृत्यूचे कारण निश्चित करता आलेले नाही. आता फॉरेन्सिक अहवालानंतरच या गूढ मृत्यूवरून पडदा उठण्याची शक्यता आहे.

शनिवारी (दि.२०) जंगल परिसरात दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर वनमजुरांनी शोधमोहीम राबविली. त्यावेळी पिपरी दीक्षित गावातील तलावालगतच्या जंगलात एका प्रौढ वाघाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता वाघाचा मृत्यू सुमारे सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळीच शवविच्छेदन केले. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण चे प्रतिनिधी राजू कहीलकर तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर उपस्थित होते.

मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे तर दूरच, त्याचे लिंगही निश्चित करता आले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, शवविच्छेदनादरम्यान व्हिसेरा नमुने संकलित करण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, गुरुवारी १२ जून रोजी गावालगतच्या तलाव परिसरात एका वाघाने म्हशींच्या कळपावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात काही म्हशी जखमी झाल्या असल्या तरी कळपाने प्रतिकार केल्याने वाघाला माघार घ्यावी लागली होती. त्या झटापटीत वाघ गंभीर जखमी झाला असावा आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वन विभागाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या शक्यतेलाही फॉरेन्सिक अहवालाचीच पुष्टी आवश्यक असल्याचे वाघाये यांनी स्पष्ट केले.

तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वन विभागाने नियमानुसार घटनास्थळीच मृत वाघाच्या अवशेषांचे दहन केले.

विशेष म्हणजे, यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत दोन बछड्यांसह एकूण १२ वाघांचा मृत्यू झाला असून, या नव्या घटनेमुळे वन्यजीव संवर्धनाबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT