Chandrapur Illegal Cattle Transport Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime | चंद्रपुरात अवैध ६३ जनावरांची वाहतूक: ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

५ आरोपींना अटक, ११ जणांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Illegal Cattle Transport

चंद्रपूर: चंद्रपूर शहरात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ६३ जनावरे आणि सुमारे ५८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असून ११ जणांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.७) करण्यात आली.

चंद्रपूर शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विविध गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने प्रोव्हिजन, जुगार अड्डे, मोटारसायकल चोरी, घरफोडी तसेच अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, पथक चंद्रपूर शहरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एम.ई.एल. नाका, मुल रोड, चंद्रपूर येथे दोन टाटा कंपनीच्या ट्रकमधून अवैधरित्या जनावरांची वाहतूक सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई करत या वाहनांना अडविले. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली ६३ जनावरे आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी ६३ जनावरे, एक पायलटिंगसाठी वापरलेली चारचाकी गाडी, दोन ट्रक तसेच आरोपींकडील पाच मोबाईल असा एकूण सुमारे ५८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 63 जनावरांचे जीव वाचले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी शेख हाशम शेख मोला (वय २७), मोसिन बेग मुबारक बेग (वय २९), शेख अन्सारी अशरफ मिया (वय ३०), समीर खान करीब खान (वय १८) आणि शेख जुनेद साबीर हुसेन (वय १९) यांना अटक केली आहे. याशिवाय इम्रान कुरेशी, सादिक कुरेशी, आवेश कुरेशी (सर्व रा. गडचांदूर), सोहल (रा. गोयगाव, ता. राजुरा) आणि वसीम कुरेशी (रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर) यांच्यासह एकूण ११ आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेली ६३ जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर, जिल्हा चंद्रपूर येथे जमा करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास रामनगर पोलीस ठाणे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT