Chandrapur Narcotics raid
चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने रहमत नगर परिसरात छापा टाकून ८ किलो ९१५ ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा) जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ८१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, अब्दुल शाहरुख अब्दुल रज्जाक (वय ३५) रा. दर्गा वार्ड, घुटकाला, चंद्रपूर) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने आपल्या साथीदार मोबीन (रा. चंद्रपूर) याच्यासह रहमत नगर येथील केजीएन लॉन जवळ राहणाऱ्या साबीराबी रफीक शहा यांच्या घरातील एक खोली भाड्याने घेतली आहे. त्या ठिकाणी त्यांनी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, भाड्याने दिलेल्या खोलीत पिवळ्या रंगाच्या पोत्यात प्लास्टिक पॉलिथिनमध्ये ठेवलेला हिरवट रंगाचा सुकलेला गांजा (वनस्पतीची पाने, फुले, देठ व बिया) आढळून आला. त्याचे एकूण वजन ८ किलो ९१५ ग्रॅम असून बाजारभावानुसार सुमारे ८१,१५० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अब्दुल शाहरुख अब्दुल रज्जाक व त्याचा साथीदार मोबीन यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपूर येथे गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचा सहभाग होता.