चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Police | महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दक्षता समिती व ज्येष्ठ नागरिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Women Safety, Senior Citizens Security

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुरुवारी (दि.२१) चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला दक्षता समिती आणि ज्येष्ठ नागरिक समितीची संयुक्त बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. समाजातील संवेदनशील घटकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, त्यांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे आणि प्रशासनाशी त्यांचा समन्वय अधिक मजबूत करणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता.

बैठकीदरम्यान महिला सुरक्षा, समुपदेशन, ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण आणि पोलीस प्रशासनाशी प्रभावी संवाद या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांच्या तक्रारींचे जलद निवारण, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना अधिक प्रभावी करणे तसेच पीडित महिलांना मानसिक आणि कायदेशीर आधार उपलब्ध करून देण्यासाठी महिला दक्षता समितीने अधिक सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

तसेच, एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यासमोरील सुरक्षेच्या समस्या आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि समिती सदस्यांमध्ये सातत्यपूर्ण संवाद ठेवण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत पोलीस प्रशासन, महिला दक्षता समिती आणि ज्येष्ठ नागरिक समिती यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करून समाजातील या घटकांसाठी एक मजबूत संरक्षण कवच उभे करण्याची रणनीती आखण्यात आली. “महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. समिती सदस्यांनी नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही सांगण्यात आले.

या बैठकीला पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सपोनि प्रजा वाडेकर (भरोसा सेल), पोउपनि रविंद्र चेरकुलवार (वाहतूक शाखा), समाज कल्याण निरीक्षक पुनम आसेगांवकर, डॉ. प्रियंका पेन्दोर, डॉ. नसरीन मावाणी, अॅड. आम्रपाली लोखंडे, अॅड. प्रिती खातखेडे, समुपदेशिका भावना रंगारी, उज्ज्वला पोईनकर, डॉ. अल्का ठाकरे, नगरसेविका पुष्पा उराडे, चंदाताई वैरागडे, तसेच ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी श्रीराम तोडासे, पुरुषोत्तम राऊत, रमेश कासुलकर, रमेश ददगाल आणि गोसाई श्रावण बल्की यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT