

Mul Police Prompt Action
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल पोलीस ठाण्याच्या सतर्क आणि तत्पर कार्यामुळे एका महिलेला तिची महत्त्वाची बॅग अर्ध्या तासात परत मिळाली. सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन पोलीसांनी हरवलेली बॅग मूळ मालकिणीपर्यंत सुखरूप पोहचवली. या कामगिरीबद्दल संबंधित महिलेने पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
३० जून २०२५ रोजी पडोली येथील मंजुषा मनोज नैताम ह्या नातेवाईकांसह गडचिरोली येथून चंद्रपूरकडे प्रवास करत असताना मुल बस स्थानक परिसरात त्यांची कथ्या रंगाची लेदर बॅग हरवली. या बॅगेमध्ये ३०,००० रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, २५०० रुपये रोख रक्कम, एक एटीएम कार्ड आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज होते. बॅग हरवल्याचे लक्षात येताच तिने आणि तिच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला, मात्र काहीही हाती न लागल्याने त्यांनी थेट मुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत, मुल पोलिसांनी सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला. अल्पावधीतच, म्हणजे अर्ध्या तासाच्या आत, हरवलेली बॅग शोधून काढण्यात आली व संपूर्ण साहित्यसह ती महिलेच्या ताब्यात देण्यात आली. ही कौतुकास्पद कामगिरी मुल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि वर्षा नैताम, नापोअं चिमाजी देवकते, पोअं. शंकर बोरसरे आणि पोअं. नरेश कोडापे यांनी केली.