Voter List Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | वरोरा-भद्रावतीत ५९ हजारांहून अधिक मतदारांची माहिती अपूर्ण

३१ मेपूर्वी पडताळणी न केल्यास नावे मतदार यादीतून वगळण्याची शक्यता; निवडणूक विभागाचे तातडीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील तब्बल ५९ हजार ६६८ मतदारांची माहिती अद्याप अद्ययावत न झाल्याने संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू असून, २००५ पूर्वी मतदार म्हणून नोंद झालेल्या नागरिकांची विशेष पडताळणी केली जात आहे.

निवडणूक विभागाकडून मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक मतदारांनी आवश्यक कागदपत्रे व माहिती अद्याप सादर न केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. संबंधित मतदारांनी आपल्या भागातील बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्याशी तातडीने संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

मतदारांच्या सोयीसाठी विभागाने क्यूआर कोड तसेच ऑनलाइन लिंकची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना स्वतःची माहिती तपासता व अद्ययावत करता येणार आहे. विशेषतः नाव, पत्ता, जन्मतारीख, ओळखपत्राची माहिती यामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ पर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या मतदारांची नावे आगामी पुनरीक्षित मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी निवडणूक विभागाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा अधिकार अबाधित राहावा यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने वेळेत आपली माहिती अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमातूनच माहिती घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT