चंद्रपूर : जिल्ह्यातील शासकीय शाळा आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वसतिगृहांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड नॅपकीन तसेच सुरक्षेच्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याची मागणी युवासेनेने केली आहे. या संदर्भात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे आणि युवासेना चंद्रपूर विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने हा मुद्दा उपस्थित केला.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असल्याने शाळा व वसतिगृहांच्या परिसरात साप, विंचू तसेच अन्य वन्यजीवांचा धोका विद्यार्थ्यांना संभवतो. लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात घडलेल्या सर्पदंशाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वसतिगृहांमध्ये सर्पदंशासह वन्यजीवांपासून बचावासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा आणि वसतिगृहांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तेथील समस्यांची चौकशी करावी. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांना कडक निर्देश द्यावेत, अशी मागणी युवासेनेने केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि शैक्षणिक वातावरणाशी संबंधित या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, युवासेनेच्या निवेदनाची दखल घेत जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा व वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
यावेळी महानगर प्रमुख सुरेशभाऊ पचारे, युवासेना शहर प्रमुख सय्यद फरदिन, तालुका प्रमुख सागर गभणे, तालुका समन्वयक पवन उडाके, आरिश शेख, अबरार शेख, सय्यद आकिब, रझा सिद्दिकी, अरशिद शेख, अहफाज शेख, फरहान खान, साहेजान शेख, जुनैद शेख यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.