Mukesh Jivtode arrested in Chandrapur  
चंद्रपूर

Chandrapur Mukesh Jivtode arrested |त्रिशूल आंदोलन भोवले? भाऊबीजेच्या दिवशी मुकेश जीवतोडे यांना अटक; भद्रावतीत राजकीय वातावरण तापले

Mukesh Jivtode arrested in Chandrapur | त्रिशूल आंदोलन भोवले? भाऊबीजेच्या दिवशी मुकेश जीवतोडे यांना अटक; भद्रावतीत राजकीय वातावरण तापले

पुढारी वृत्तसेवा

त्रिशूल आंदोलन प्रकरणात घुग्घुस पोलिसांची कारवाई

दिवाळीनंतर हजर राहण्याची विनंती करूनही निवासस्थानी जाऊन अटक

चंद्रपूर - दिवाळीच्या सणाचा आनंद सुरू असतानाच भाऊबीजेच्या दिवशी शिवसेना नेते मुकेश जीवतोडे यांना घुग्घुस पोलिसांनी वरोरा येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात करण्यात आलेल्या त्रिशूल आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

सणासुदीच्या दिवशी झालेल्या या अटकेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्रिशूल आंदोलनानंतर विधानपरिषदेचे आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान संबंधितांचे आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याने पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची सूचना केली होती.

दरम्यान, दिवाळीचा सण लक्षात घेता दिवाळीनंतर पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची विनंती मुकेश जीवतोडे यांनी पत्राद्वारे पोलिसांकडे केली होती. मात्र, ही विनंती करण्यात आलेली असतानाही पोलिसांनी भाऊबीजेच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी धडक देत त्यांना अटक केली.

स्थानिक बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरून झालेल्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः सणाच्या दिवशी झालेल्या अटकेमुळे समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, भद्रावतीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात या कारवाईची चर्चा रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT