Chandrapur News : चंद्रपूर मनपातील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची नियुक्ती, अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली

धानोरकर-वडेट्टीवार गटांतील ऐक्याला पुन्हा तडा, सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदावरून उचलबांगडी
Chandrapur News : चंद्रपूर मनपातील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची नियुक्ती, अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. काँग्रेसच्या गटनेतेपदी राजेश अडूर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकत्र येत पक्षातील मतभेद मिटवून ऐक्याची भूमिका जाहीर केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेतील गटनेता बदलला जाणार नाही, यावर एकमत झाले होते. मात्र, या निर्णयाला आता हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे.

सध्याचे गटनेते सुरेंद्र अडबाले हे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे समर्थक मानले जातात; तर नव्याने नियुक्त झालेले राजेश अडूर हे विजय वडेट्टीवार यांचे समर्थक आहेत. सप्टेंबर महिन्यात धानोरकर गटातील तीन नगरसेवकांनी वडेट्टीवार गटात प्रवेश केल्याने वडेट्टीवार गटाचे पारडे जड झाले होते. त्यानंतर गटनेतेपदावरून पक्षात संघर्ष निर्माण झाला होता. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांत ऐक्य घडवून आणले होते. त्यावेळी सुरेंद्र अडबाले यांना गटनेतेपदावरून हटवले जाणार नाही, असे ठरल्याची माहिती आहे.

मात्र, वडेट्टीवार गटाने आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत नागपूर विभागीय आयुक्तांकडे सादर केलेला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी बहुमताच्या आधारे राजेश अडूर यांची चंद्रपूर मनपातील काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील ऐक्याच्या घोषणेला पुन्हा एकदा तडा गेल्याचे स्पष्ट होत असून चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा ऐरणीवर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.