चंद्रपूर : मानवी जीवन व पर्यावरणासाठी अत्यंत घातक असलेल्या प्रतिबंधीत नायलॉन मांजाच्या विक्रीविरुद्ध ब्रम्हपुरी पोलिसांनी ठोस कारवाई करत एका दुकानदारावर गुन्हा दाखल केला असून, त्याच्याकडून ३५ हजार रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आज शनिवारी ( १० जानेवारी २०२६ ) रोजी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांचा शोध घेत असताना पोलिसांना बातमीदारांकडून गोपनीय माहिती मिळाली. बालाजी वार्ड, ब्रम्हपुरी येथील दिलीप रामचंद्र गजपुरे हा आपल्या ‘ओमकार डेली निड्स’ दुकानात प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा कारवाई करत संबंधित दुकानाची झडती घेतली. झडतीदरम्यान पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा, मानवी जीवितास तसेच पर्यावरणास गंभीर धोका निर्माण करणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजा MONO KTC व MONO FIGHTER प्रकारातील एकूण ३० प्लास्टिक चक्री बंडल, अंदाजे किंमत ३५,००० रुपये, अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला. सदर प्रतिबंधीत नायलॉन मांजा साठा जप्त करून पोस्टे ब्रम्हपुरी येथे पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत कलम ५ व १५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे..
सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोहवा मुकेश गजबे, पोलीस अंमलदार निलेश तुमसरे, इरशाद खान, स्वप्नील पळसपगार, वशिष्ठ रंगारी व प्रविण भिवगडे यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना आवाहन
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, थाऊक किंवा किरकोळ व्यापारी प्रतिबंधीत नायलॉन मांजा साठवताना, विक्री करताना किंवा वाहतूक करताना आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर येथील पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन केले आहे.